गण - गौळण , लावणी , नृत्य , रंगबाजी आणि वगनाट्य या घटकांच्या क्रमवारीत रंगत जाणारा "तमाशा" केंव्हातरी करमणुकीचे कार्यक्रम बघायला मिळणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांनी तसा जणू डोक्यावरच उचलून घेतला होता. करमणुकीच्या साधनांमध्ये झालेले अमुलाग्र बदल , घरोघरी आलेले दूरदर्शन संच यामुळे प्रेक्षकांच्या कलास्वादातही बदल घडत गेले. लोककलेचा वारसा सांगणाऱ्या तामाशालाही त्यामुळे बदल घडवत पुढे जावे लागले.

" गण - गौळण " आणि " सोंगाड्या " च्या मुख्य आधारावर तमाशा आपले अस्तित्व राखू शकला. किंबहुना या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा तमाशाकडे आकर्षित केले. गेली तीन दशकांपासून "सोंगाड्या " च्या रूपाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजिवणारे तमाशा कलेतील एक नाव म्हणजे नितीनकुमार ( नितीनकुमार बनसोडे ) तमाशाचा समृद्ध वारसा लाभलेल्या नितीन कुमारने वयाच्या सातव्या वर्षी स्वत:ला या कलासेवेला वाहून घेतले. आई मंगला बनसोडे आणि नितीनकुमार यांनी आपल्या आदकारीने आणि प्रसंगावधानी संवादाने उभा महाराष्ट्र बेहोश केला. यामागची प्रेरणा आदर्श आणि ग म भ न चे शिक्षण न घेताही आलेला अभ्यास अतिशय महत्वाचा ठरला असल्याचे नितीनकुमार सांगतात.

नितीनच्या आईचे मामा शंकरराव खुडे यांच्यासह कैलास सावंत , दत्ता महाडिक , गुलाबराव बोरगावकर , काळू - बाळू , रघुवीर खेडकर या विनोदवीर सोंगाड्याच्या आदर्श नितीन समोर आहे. रसिकांची मने जिंकणे हे कलाकाराचे साध्य असते. त्यासाठी श्रमीक शिक्षणाची गरज नसते तर साधना महत्वाची असते. अशीच साधना नितीनने केली . म्हणूनच गेली तीन दशके यशाच्या शिखरावर राहण्याचा मान त्याला मिळाला आहे. अर्थात मंगला बनसोडे यांची प्रेरणा आणि कालसंगत याचा वातही महत्वपूर्ण आहेच. अभिनया बरोबरच वादन कलेतही नितीनची मुशाफिरी आहे. ढोलकीवर विजेसारखा फिरणारा हात त्याची साक्ष पटवतो. " आईचे नृत्य आणि मुलाची ढोलकी" हे समीकरण रसिक आजही विसरलेले नाहीत.

तमाशातील यश माझा पाठलाग करीत असल्याची अनुभूती मी घेतलेली आहे. असे सांगताना नितीनला कोणताही अहंपणा नाही. कारण कलेसाठी जगन आणि महाराष्ट्राच्या मातीला, तेथील साध्या भोळ्या माणसांना रिझवत असताना मन मोकळ ठेवाव लागत. याची जाण त्याला केंव्हाच झाली आहे. म्हणूनच चित्रपटासारख्या ग्ल्यामरस क्षेत्रात त्याचं मन रमलं नाही. आपल्या अस्सल माणसाचे मनोरंजन फक्त तमाशातूनच होऊ शकते असं त्याचे मन सांगत होते. सुरवातीला संधी मिळाली म्हणून 'आता लग्नाला चला' , 'बापू बिरू वाटेगावकर' असे चित्रपट नितीनने केलेही. मकरंद अनासपुरे , रमेश भाटकर , स्मिता तळवलकर , सयाजी शिंदे , मिलिंद गुणाजी अशा आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मात्र तेथे नितीनचे मन रमले नाही. त्याला आस राहिली ती तमाशाची ,लोकरंजनाची. म्हणूनच चित्रपट क्षेत्रातील अनेक ऑफर्स येऊनही तो त्यापासून दूर राहिला. तमाशा कलेत गाणारा उत्कृष्ठ गायक , उत्कृष्ठ वादक , नर्तक आणि रंगमंचावर वावरणारा रसिकांचा आवडता सोंगाड्या म्हणून उभा महाराष्ट्राने नितीनला डोक्यावर घेतले आहे. त्याचे हे यश असेच बहरत राहो अशी सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने त्याला शुभेच्छा.